अमेरिकेतील अ‍ॅटलांटा शहर आणि उपनगरातील हिंसाचाराची घटना घडली. दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. मंगळवारी झालेल्या या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आशियाई वंशाच्या महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला दक्षिण पश्चिम जॉर्जिया भागातून अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अ‍ॅटलांटा शहराचे मुख्य पोलीस अधिकारी रॉडनी ब्रायंट यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. पहिली घटना अ‍ॅटलांटातील ईशान्ये भागामध्ये असलेल्या एका मसाज पार्लरमध्ये घडली. इथे करण्यात आलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण मरण पावले. चारही महिला असून, त्या आशियाई वंशाच्या असल्याचं ब्रायंट यांनी सांगितलं.

सायंकाळी ५.५० वाजता मसाज पार्लरमध्ये चोरी झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन महिलांचा मृत्यू झाल्याचं अ‍ॅटलांटा पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पाहणी करत असतानाच आणखी एका पार्लरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती फोनवरून कळाली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात चार महिला मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तत्पूर्वी ५ वाजता उत्तर अ‍ॅटलांटापासून ५० किमी अंतरावर असलेल्या अकवर्थमधील यंग्स एशियन मसाज पार्लरमध्ये ५ जणांवर गोळीबार करण्यात आला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आरोपी गोळीबार करत असल्याचं कैद झाल्याचं दिसल्यानंतर रॉर्बट अरॉन लॉग याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.