तेहरान : अमेरिकेने गेला बराच काळ युद्धखोरीची भाषा केली असली तरी त्याचा काही उपयोग झाला नसून आता आम्ही अणुकरारावेळी दिलेली वचने कमी करणार असून युरेनियम शुद्धीकरणाला आणखी चालना दिली जाईल, असे इराणचे अध्यक्ष हासन रूहानी यांनी सांगितले.

इराणचे अध्यक्ष हासन रूहानी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दूरचित्रवाणीवर केलेल्या भाषणात अमेरिकेला इशारा दिला आहे.

त्यात ते म्हणतात की, ‘अमेरिकेने आतापर्यंत युद्धखोरीची भाषा केली आहे. त्यांनी नेहमी युद्धपिपासूपणाच जोपासला पण त्याचा त्यांना काहीही फायदा होणार नाही. त्यांनी या दोन्ही गोष्टी सोडून द्याव्यात. अमेरिकेने आमच्याबर भरपूर दबाव आणून पाहिला, पण आम्ही त्याला विरोध करून त्याविरोधात खंबीरपणे उभे ठाकलो आहोत.’

गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ मधील अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणवर निर्बंध लादले होते. तेव्हापासून दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. २०१५ मध्ये ओबामा यांनी इराणशी केलेला अणुकरार ट्रम्प यांनी मोडीत काढला होता.

इराणने अलीकडेच प्रगत सेंट्रीफ्युजेसचा वापर सुरू करून २०१५ च्या करारातील काही वचनांचा भंग केला आहे. ३०० किलोग्रॅम युरेनियमची मर्यादा जुलैतच ओलांडली असून शुद्धीकरणाची ३.६७ टक्क्य़ांची मर्यादाही पार करण्यात आली आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेने जर संयुक्त सर्वंकष कृती योजनेचे पालन करण्याचे आश्वासन दिले तर आम्हीही तसे करण्यास तयार आहोत. आमचा अणुकार्यक्रम शांततामय कार्यासाठी आहे, वचनाला वचन असे आमचे धोरण आहे. त्यामुळे अमेरिकेने त्यांची आश्वासने पाळली तर आम्ही आमची पाळू.

– हासन रूहानी, इराणचे अध्यक्ष