वॉशिंग्टन :  रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केल्याचा निर्णय घेतल्याने आता भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

एस ४०० ही रशियाची अधिक प्रगत लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रणाली असून चीनने ती प्रथम सरकार पातळीवरील करारात २०१४ मध्ये रशियाकडून विकत घेतली होती. भारत व रशिया यांच्यात ५ अब्ज डॉलर्सचा करार गेल्या ऑक्टोबरमध्ये झाला असून त्याअंतर्गत एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली भारताला देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यापक चर्चेनंतर या कराराला मान्यता दिली होती.

परराष्ट्र खात्याच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी वार्ताहरांना सांगितले की, भारताने एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली रशियाकडून विकत घेतल्याचा निर्णय अमेरिकेला पटलेला नाही. हा फार विशेष करार नाही असे भासवण्याचा भारताने केलेला प्रयत्न फसला असून अमेरिकेने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

भारताच्या सवलती काढून घेण्यावर अमेरिका ठाम

वॉशिंग्टन : भारताचा व्यापार अग्रक्रम दर्जा (जीएसपी) काढून घेण्याचा निर्णय झाला तो झाला आता त्यात फेरविचार केला जाणार नाही, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. भारताचा जीएसपी (जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा काढून घेतल्याने विकसनशील देश म्हणून भारताला मोठा फटका बसला आहे.