News Flash

अमेरिकेडून निर्णयाचे स्वागत ; हाफीज सईदला कारावासाची शिक्षा

अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले होते

| February 14, 2020 02:36 am

(संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा (जेयूडी) म्होरक्या हाफीज सईद याला दहशतवादी कारवायांना आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली त्याचे अमेरिकेने स्वागत केले आहे.

हाफीज सईद याला कारावसाची शिक्षा ठोठावून पाकिस्तानने दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबत आणि लष्कर-ए-तोयबाला गुन्ह्य़ांसाठी जबाबदार धरण्याबाबत आपली आंतरराष्ट्रीय बांधिलकी पाळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

हाफीज सईद हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक दहशततवादी असून अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले होते, त्याला बुधवारी ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने निर्णयाचे स्वागत केले.

पॅरिसमध्ये आर्थिक कारवाई कृती दलाची (एफएटीएफ) एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यावेळी काळ्या यादीतून वाचण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी पाकिस्तान आपली भूमिका मांडणार आहे.

सईदच्या शिक्षेची अंमलबजावणी किती कार्यक्षमतने होते ते पाहावे लागेल

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध पाकिस्तानने कोणती कारवाई केली आहे याचा आढावा जागतिक पातळीवरील जागल्याकडून काही दिवसांमध्ये घेतला जाणार आहे, त्यामुळेच जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाची पाकिस्तान किती कार्यक्षमतेने अंमलबजावणी करतो ते पाहावे लागेल, असे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

आर्थिक कारवाई कृती दल (एफएटीएफ) या जागतिक पातळीवरील दहशतवादविरोधी जागल्याकडून पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कोणती पावले उचलली आहेत त्याचा चार दिवसांनी पॅरिसमध्ये होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. त्यापूर्वीच चार दिवस अगोदर सईदला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 2:36 am

Web Title: us welcomed the conviction of hafiz saeed zws 70
Next Stories
1 चीनमधून आपल्याला हलवण्याची भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांची विनंती
2 दोन प्रवाशांना ‘करोना’ची लागण ; कोलकाता विमानतळावर थर्मल चाचणी
3 सीबीआय चौकशीची मागणी; जनहित याचिका फेटाळली
Just Now!
X