अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊनचा परिणाम आता व्हाईट हाऊवरही व्हायला लागला आहे. मागील काही महिन्यांपासून पगार न झाल्याने व्हाईट हाऊसमधील शेफ सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे व्हाईट हाऊसमधील किचनचे काम ठप्प झाले आहे. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी कॉलेज फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवलेल्या क्लेमसन टायगर्स या टीमला व्हाईट हाऊसमध्ये दुपारच्या जेवणासाठी बोलावले होते. नेमक्या त्याच दिवशी शेफ सुट्टीवर गेल्याने काय करायचे असा प्रश्न ट्रम्प यांच्यापुढे उभा राहिला. या टीमला आधीपासून निमंत्रण दिल्याने ते रद्द करणे शक्य नव्हते. या पाहुण्यांची सोय काय करायची असा प्रश्न ट्रम्प यांच्यापुढे उभा राहीला. त्यांना थेट बाहेर ऑर्डर देऊन पदार्थ मागवावे लागले.

यावेळी ट्रम्प यांनी फास्टफूड ऑर्डर केले. यामध्ये पिझ्झा, बर्गर, आणि फ्रेंच फ्राईज यांचा समावेश होता. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ही ऑर्डर आपल्या स्वत:च्या पैशाने दिली आणि ते बिल व्हाईट हाऊसच्या नावावरही लावले नाही. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी काँग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे ‘शटडाऊन’ सुरु झाले आहे.

रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यामुळे रात्री बाराचा ठोका पुढे सरकताच अनेक मुख्य संस्थांचे कामकाज बंद झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: “बंद’ असणार आहे.