अमेरिकेमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका २३ वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने १४ वर्षीय मुलासोबत शरीरसंबंध ठेवले होते. या प्रकरणासंदर्भात  पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तपास सुरु झाला आणि ही महिला गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर या गुन्ह्याचा भांडाफोड झालाय.

खरं तर हे प्रकरण २०२० मधील असलं तरी या मुलासोबतच्या लैंगिक संबंधांमुळे महिला गरोदर राहिल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अमेरिकेतील अरकैंसास येथील पोलिसांना लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर एक फोन आला. द सनने दिलेल्या वृत्तानुसार या फोन कॉलवर एक २३ वर्षीय महिला १४ वर्षीय मुलासोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचं आपण स्वत: पाहिलं असल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली होती. ब्रिटनी ग्रे असं या आरोपी महिलेचं नाव असून सर्वात आधी तिच्यासंदर्भात पोलिसांना मागील वर्षी २८ फेब्रुवारी रोजी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी पुन्हा तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. ही महिला एका वर्षाहून अधिक काळापासून या मुलावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर एका खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी या महिलेला रंगेहाथ पकडलं.

रॉण्डा थॉमस या खबऱ्याने न्यायालयासमोर दिलेल्या माहितीनुसार ही महिला गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहेत. या अहवालांवरुन ही महिला या मुलासोबत ठेवलेल्या शरीरसंबंधांमधून गरोदर आहे हे सिद्ध होत असल्याचा दावा न्यायालयासमोर करण्यात आला आहे. इतकचं नाही तर याचिका दाखल करताना पोलिसांनी पुरावा म्हणून ही महिला ज्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जायची त्याचे सीसीटीव्ही फुटेजही सादर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ही आरोपी महिला त्या १४ वर्षीय मुलाबरोबर रुग्णालयामध्ये शिरताना दिसत आहे. एक मार्च रोजी या महिलेला अटक करण्यात आली आहे. सध्या या महिलेला काय शिक्षा देण्यात यावी यासंदर्भात निर्णय झालेला नाही. या महिलेला पाच हजार डॉलर दंडाच्या मोबदल्यात जामीन मंजूर करण्यात आला असून पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.