अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे, ती रायफल इसिसच्या दहशतवाद्यांना वापरता येणार नाही, त्यात बायबलमधील भाग व ख्रिश्चन चिन्हे कोरलेली आहेत. एआर १५ या रायफलीचे नामकरण क्रुसेडर असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस व दुसऱ्या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे.

मुस्लिम दहशतवाद्यांना न वापरता येणारी रायफल असा दावा स्पाईकस टॅक्टिकल कंपनीने केला आहे. कंपनीचे प्रवक्ते माजी नेव्ही सील बेन मुकी थॉमस यांनी सांगितले की, मुस्लिम दहशतवादी ही रायफल वापरू शकणार नाहीत कारण त्यांची धर्मावर श्रद्धा असते व या रायफलवर ख्रिश्चन धर्माची चिन्हे आहेत. गेल्या आठवडय़ात ही रायफल विक्रीस आली असून फ्लोरिडातील कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स या संस्थेने त्याचा निषेध केला आहे. यात मुस्लिमांचा अपमान करण्याचा हेतू नाही असे थॉमस यांनी सांगितले. या रायफलला पीस, वॉर व गॉड विल्स इट अशी तीन सेटिंग्ज आहेत. या रायफलची विक्री झाली असून तिची किंमत ९६० ते ३००० डॉलर दरम्यान आहे. अमेरिकी शस्त्रास्त्रे जिहादींच्या हातात पडत आहेत अशी भीती व्यक्त होत असल्याने ही रायफल तयार केली आहे.
इसिसच्या व्हिडिओत दहशतवादी एम १६ या इराकी सैनिकांकडून हिसकावलेल्या रायफली वापरलेल्या दिसत आहेत तसेत अमेरिकेने तेथे जी शस्त्रास्त्रे टाकली होती ती इसिसकडे आहेत.