अमेरिकेत कार्यकर्ते, मोदीविरोधी गट आणि पटेल समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे गुरुवारी अमेरिकेत आगमन झाले आहे.
न्यूयॉर्क आणि सॅन जोए येथे विविध मार्गानी मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सोशल साइटच्या माध्यमातूनही मोदी यांच्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले असून या मोहिमेला ‘मोदीफेल’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेतील आक्रमक गटाने इतर गटांशी युती केली असून ते सिलिकॉन व्हॅली येथे मोदींविरोधात आंदोलन करतील. तसेच मोदी यांच्या सभेतही हे आंदोलन करण्यात येणार आहे. मोदी यांच्या धोरणाला आमचा विरोध असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. मोदी २७ सप्टेंबर रोजी सॅन जोए येथे १८ हजार ५०० लोकांसमोर भाषण देणार असून या वेळी कार्यक्रम सुरू असलेल्या एसएपी सेंटरसमोरही मोदींविरोधात घोषणा दिल्या जातील, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
न्यूयॉर्कमधील शीख समाजही या आंदोलनात सहभागी होणार आहे. फेसबुक मुख्यालयात मोदी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झकेरबर्ग यांना प्रश्न विचारणाऱ्यास १० हजार डॉलर पारितोषिक देण्यात येणार आहेत.
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठय़ा प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर पटेल समाजाने अमेरिकेतही मोदींविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचे कारण सांगत अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेनेही मोदींविरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे.