तुम्हाला लक्षाधीश व्हायचंय.. मग फक्त एवढे करा, गणितातला तो कूटप्रश्न सोडवलात तर तुम्हाला १० लाख अमेरिकी डॉलर मिळतील. काम म्हटले तर सोपे, पण ज्याला गणिताची आवड आहे अन् त्यात गतीही आहे त्यांच्यासाठी.. गेली अनेक वर्षे जगभरातील प्रज्ञावंतांना न सुटलेले ते गणिती कूटप्रश्न सोडवणाऱ्यास हे बक्षीस जाहीर केले आहे, ते डल्लास येथील बँकरने. ऱ्होड आयलंड येथील अमेरिकन मॅथॅमेटिकल सोसायटीने त्यांच्या वतीने या बक्षिसाची घोषणा करताना मूळ कूटप्रश्न सोडवण्यासाठी बक्षिसाची रक्कम वाढवून १० लाख डॉलर करण्यात आल्याचे म्हटले आहे. अंकीय सिद्धान्तातील बिल काँजेक्चरचा कूटप्रश्न सोडवणाऱ्यास हे बक्षीस दिले जाणार आहे. या कूटप्रश्नाला व पुरस्कारालाही डल्लास येथील बँकर डी अँड्रय़ू ‘अँडी’ बिल यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांना अंकीय सिद्धान्तात मोठा रस आहे व तो कूटप्रश्न सोडवण्यासाठीच्या बक्षिसाची रक्कमही त्यांनी दिलेली आहे. याच प्रकारचा फेरमॅट लास्ट थिअरम (सिद्धान्त) १९९०मध्ये अँड्रय़ू वाईल्स व रीचर्ड टेलर यांनी सिद्ध केला होता. फेरमॅट लास्ट थिअरम व बिल काँजेक्चर या दोन्ही कूटप्रश्नांत अनेक साम्य असलेली विधाने आहेत. ती दिसायला वरकरणी खूप सोपी वाटतात, पण सिद्ध करायला खूप अवघड आहेत. अँडी बिल यांनी बिल काँजेक्चरसाठी १९९७ मध्ये पहिल्यांदा बक्षीस जाहीर केले, पण आजपर्यंत कुणालाही तो प्रश्न सोडवता आला नाही. यापूर्वी तो सोडवण्यासाठी १ लाख अमेरिकी डॉलर इतके बक्षीस त्यांनी ठेवले होते ते आता १० लाख डॉलर केले आहे.
फेरमॅट प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जे बक्षीस लावले होते, त्यापासून आपण प्रेरणा घेऊन रक्कम वाढवली असे स्वयंशिक्षित गणितज्ञ असलेले बिल सांगतात. त्यांना अंकीय सिद्धान्तात मोठे स्वारस्य आहे.