04 March 2021

News Flash

व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात प्रचार

लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाडय़ात व्यंगचित्राची भाषा टीकेच्या पातळीवर नेली जात आहे.

|| सुहास सरदेशमुख

लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाडय़ात व्यंगचित्राची भाषा टीकेच्या पातळीवर नेली जात आहे. व्यंगचित्रातून केलेली टिप्पणी भल्याभल्यांची टोपी उडवत आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघांत खासदार चंद्रकांत खैरे, ओम राजेनिंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरील व्यंगचित्रे तेथील राजकीय परिस्थिती आणि सत्तासंघर्ष किती तीव्र टोकाचा, ही सांगणारी ठरली आहेत.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्वत:जवळ एक चमत्कार घडवून आणणारी पुडी असते, असे जाहीरपणे सांगितले. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते शिडीवर चढले. तेव्हा पुतळ्याला हार घालण्यापूर्वी खिशातून त्यांनी एक पुडी काढली. खैरे यांच्याविषयीच्या अनेक दंतकथाही त्यांचे समर्थक सांगतात. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद येथे समाजमाध्यमावर ‘चेंज फॉर बॅटर औरंगाबाद’ असे मुखपृष्ठ करण्यात आले आहे. त्यात खासदार खैरे मांत्रिकाच्या भूमिकेत आहे, असे व्यंगचित्र रंगवण्यात आले आहे. शहराला चार दिवसाआड कसाबसा पाणीपुरवठा होतो. अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे नागरिक वैतागले आहेत. मात्र, त्याचे खासदारांना काहीएक देणेघेणे नाही. सत्तेसाठी ते समाजात तेढ निर्माण करतील, बुद्धी वशीकरणाचा जप सांगतील, अशा आशयाचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. या व्यंगचित्राला प्रकाशक असा कोणी नाही किंवा या व्यंगचित्राची मालकी घेतलेली नाही;  ही व्यंगचित्रे ‘व्हायरल’ झाली आहेत.

व्यंगचित्रांतून प्रतिस्पर्धा उमेदवारावर टीका करण्याचा हा खेळ  उस्मानाबाद  मतदारसंघात टोकदार झाला आहे.  टीका करण्याचा विषय कोणी तरी एकाने सांगायचा आणि व्यंगचित्रकारांनी ते व्यंगचित्र काढून द्यायचे, असा  नित्यनियम आहे एवढी व्यंगचित्रे राणाजगजितसिंह पाटील आणि ओम राजेनिंबाळकर यांनी एकमेकांविरोधात काढून घेतली आहेत. व्यंगचित्रांच्या माध्यमातून केली जाणारी टीका मराठवाडय़ाच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:11 am

Web Title: use cartoon for election campaign
Next Stories
1 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेसाठी काँग्रेस उच्च न्यायालयात
2 ‘ही निवडणूक म्हणजे पाच वर्षांचे परफॉर्मन्स ऑडिट’
3 अखेरचा हा तुला दंडवत
Just Now!
X