News Flash

“तुम्ही ‘ते’ स्वस्त तेल वापरा”, पेट्रोल दरवाढीवरून सौदीनं भारतालाच ऐकवलं!

भारतानं गेल्या वर्षी १९ डॉलर प्रति बॅरल दराने पेट्रोल खरेदी केलं होतं!

फोटो सौजन्य - फायनान्शियल एक्सप्रेस

भारतात पेट्रोलचे रोज वाढणारे दर ही आता सर्व भारतीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलं आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीसाठी एक महत्त्वाचं कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती कमी व्हाव्यात, यासाठी भारतानं OPEC या कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेकडे तेलाचं उत्पादन वाढवण्याची मागणी केली असता ओपेकचा प्रमुख घटक असलेल्या सौदी अरेबियानं उलट भारतालाच सुनावलं आहे. “तुम्ही गेल्या वर्षी खरेदी केलेलं स्वस्तातलं तेल वापरा”, असं सौदीकडून भारताला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओपेककडून उत्पादन वाढवून कच्च्या तेलाच्या किंमती खाली येण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे.

तेलाचं उत्पादन वाढवणार नाही!

कच्च्या तेलाचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या OPEC नं नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये तेलाचं उत्पादन न वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्पादनावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी ओपेक देशांकडे केली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा वाढून त्याच्या किंमती कमी होतील आणि पर्यायाने भारतातील पेट्रोलचे भाव कमी होतील. मात्र, ओपेक देशांनी भारताची ही मागणी फेटाळून लावली.

“गेल्या वर्षीचं तेल वापरा!”

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी ओपेकच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताला वेगळाच सल्ला दिला आहे. “भारतानं त्यांच्या साठ्यांमधून गेल्या वर्षी अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेलं कच्चं तेल वापरावं”, असं ते म्हणाले. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १९ डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास होत्या. तेव्हा भारतानं जवळपास १ कोटी ६७ लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करून विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) आणि मँगलोर, पदुर (कर्नाटक) इथल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये ठेवलं होतं.

दुष्काळात तेरावा महिना! आखाती देशांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे इंधन दरवाढ अटळ?

जानेवारीत उत्पादन पूर्ववत होणार होतं!

गेल्या वर्षी कोविडच्या साथीमुळे पेट्रोलची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात, यासाठी कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याच्या ओपेक देशांच्या निर्णयाला भारतानं समर्थन दिलं होतं. मात्र, तेव्हा जानेवारी २०२१मध्ये पुन्हा उत्पादन पूर्ववत करण्यात येईल, असं आश्वासन ओपेक देशांनी दिलं होतं. पण आता ते पूर्ववत न करण्याचा निर्णय OPEC नं घेतला आहे. ओपेकची पुढची बैठक १ एप्रिल रोजी होणार असून तेव्हा यासंदर्भात काही निर्णय होईल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 7:32 pm

Web Title: use cheap crude oil you bought last year opec suggest india pmw 88
Next Stories
1 १ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य
2 CBSE बोर्डाच्या १०वा, १२वी पेपरच्या तारखांमध्ये बदल! वाचा बदललेल्या तारखा!
3 आत्ताच वाद का? २०१३ मध्ये पण असे घडले होते; सीतारामन यांचे स्पष्टीकरण
Just Now!
X