आरोग्य विमा काढल्यानंतर पॉलिसी काढून देणारी कंपनी आणि डॉक्टरांच्या विविध मागण्यांच्या अडचणींना सामोरे जाण्याचा अनुभव तुम्हाला कदाचित असेलही. पण आता आरोग्य विमा काढतानाच्या अडचणींमध्ये आता आणखी भर पडलीय. कारण, आरोग्य विमा कंपन्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मॅक्स बुपा इन्श्यूरन्स कंपनीने नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांना एक पत्रक जारी केले आहे. यात केवळ जेनेरिक औषधांवरच मेडिक्लेम दिला जाणार आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केवळ जेनेरिक औषधांच्या आधारावर रुग्णांचा आजार दूर करणं शक्य नाही.

कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर केवळ काही ब्रॅण्डचीच औषध उपलब्ध असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पत्रक लागू झाल्यास आरोग्य विमा काढणाऱ्या सामान्यांसाठी हे तोट्याचे ठरणार आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची नोटीस लक्षात घेता यापुढे जेनेरिक औषधांव्यतिरिक्त इतर कोणत्याच औषधांवर मेडिक्लेम मिळणार नाही, असं मॅक्स बुपाने आपल्या संलग्न हॉस्पिटलला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मॅक्स बुपाकडून हे पत्रक ५ मे रोजीच लागू होणार होते. पण पत्रकावर ‘आयएमए’ने नाराजी व्यक्त केली. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे विभागाचे चेअरमन डॉ.संजय पाटील यावर ‘पुणे मिरर’शी बोलताना म्हणाले की, ”आम्ही ९ मे रोजी या पत्रकाविरोधात प्रतिक्रिया नोंदवली होती. रुग्णांना केवळ जेनेरिक औषधं लिहून देणं डॉक्टरांना अशक्य आहे. योग्य औषध आणि ब्रॅण्डची निवड करण्याचे स्वातंत्र्य मेडिकल स्टोअर किंवा इन्श्यूरन्स कंपनीला नसून डॉक्टरांना याचे अधिकार आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा पुनर्विचार व्हावा. यावर अद्याप समोरून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.”