लोकशाहीचा खरा हेतू नष्ट होत असल्याचे मत
निवडणुकीत पैसा आणि बळाचा गैरवापर होत असल्याबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली. या गैरप्रकारांमुळे लोकशाहीचा खरा हेतू नष्ट होत असल्याचे मुखर्जी म्हणाले.
ज्या तरुण मतदारांचा डिजिटल आणि समाजमाध्यमांच्या मंचाशी संबंध नाही अशा मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाला केले. सहाव्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
निवडणूक आयोगाची स्थापना झाली तो दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो, जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
नव्या मतदारांपर्यंत म्हणजे युवावर्गापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाने जी पावले उचलली आहेत त्याचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. समाजमाध्यमांनी युवकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल जागृती केली आहे, मात्र जो वर्ग डिजिटल प्रणालीपासून दूर आहे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे मुखर्जी म्हणाले.