सोशल मीडियामुळे माणूस आत्मकेंद्री आणि अहंकारी होतो, असे मत संरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे. सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे असून दुष्परिणामांमुळेच मी सोशल मीडियापासून लांब आहे, असे त्यांनी नमूद केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमध्ये झालेली प्रतिनीधी सभा, सोशल मीडिया, संघाच्या शाखा अशा विविध विषयांवर मत मांडले. अॅप्स, सोशल मीडियाकडे तुम्ही कसे बघता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर भागवत म्हणाले की, ते एक उपयोगी साधन आहे. आपण त्याचा वापर केला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. संघटनेत एक सुविधा म्हणून तुम्ही त्याचा वापर करु शकता. पण सोशल मीडियाचा वापर करताना आधी त्याचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे तुम्ही आत्मकेंद्रीत आणि अहंकारी बनता. तुमच्या प्रत्येक गोष्टीत ‘मी’पणा झळकू लागतो. मी समाजाचा एक भाग आहे, पण समाजासाठी थांबण्याची गरज नाही, ही भावना मनात येते. फेसबुक तर अगदी ‘फेस’च आहे, असे त्यांनी सांगितले. संघाचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहे. पण माझे नाही. ना भविष्यातही मी सोशल मीडियावर येईन. राजकारणातील मंडळींना फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट जास्त उपयुक्त ठरते. पण त्याचा वापर करताना त्यांना सावधही राहावे लागते, असे त्यांनी सांगितले. आपण सोशल मीडियाचा वापर करावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तरुणाई संघाकडे आकर्षित होत असून आम्ही त्यांना एकत्र आणू आणि देशहितासाठी त्यांच्या क्षमतेचा वापर करु, असे त्यांनी सांगितले. भारताची स्थिती बदलत असून देश आधीपेक्षा जास्त बलवान झाला आहे. साहजिकच परिस्थिती हाताळण्याची पद्धतही बदलेल, असे ते म्हणालेत. स्वातंत्र्यपूर्व काळात तरुणांमध्ये उत्साह होता. देशासाठी प्राण देण्याची त्यांची तयारी होती. आताही देशातील तरुणांमध्ये तसाच उत्साह दिसतो, असे त्यांनी म्हटले आहे.