आफ्रिकेतील नायजेरिया या देशात पाय रोवू पाहणाऱ्या ‘कू’ या भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नायजेरियाच्या सरकारने अधिकृत खाते उघडले असल्याचे ‘कू’ने गुरुवारी सांगितले.

नायजेरियन सरकार आणि कू चा प्रतिस्पर्धी असलेला ट्विटर यांच्यातील तिढ्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे. अमेरिकी समाजमाध्यम असलेले ट्विटर नायजेरियात अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याची घोषणा तेथील सरकारने गेल्या आठवड्यात केली होती.

‘नायजेरिया सरकारचे अधिकृत हँडल आता कू वर आहे’, असे कू चे सहसंस्थापक व सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी याच समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले. गंमत म्हणजे, त्यांनी हीच माहिती ट्विटरवरही शेअर केली.

नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी एका फुटीरवादी चळवळीबद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट कंपनीने काढून टाकल्यानंतर, आपण ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित करत असल्याचे नायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते. यानंतर आपले समाजमाध्यम नायजेरियात उपलब्ध असून, त्या देशातील नव्या वापरकत्र्यांसाठी नव्या स्थानिक भाषांचा वापर करण्यास आपण इच्छुक आहोत, असे कू ने म्हटले होते.