गुजरात आणि हिमाचल प्रदेशात या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफिबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) चा वापर करण्यात येणार आहे. यासाठीची निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये या मतदान पावत्यांची मोजणी होईलच असे नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

देशभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’वर अनेकांनी आक्षेप घेतले होते. मशिनमधील मतदान प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर VVPAT चा वापर केल्यास मतदात्याला आपण दिलेल्या मतदानाची पावती मिळणार आहे. यावर आपण कोणाला मतदान केले याची माहिती असणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील फेरफार रोखता येईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या निवडणूकांमध्ये VVPATचा वापर करण्याचे निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. त्यानुसार गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही पहिली राज्ये असतील, ज्या ठिकाणच्या निवडणुकीत पूर्णपणे VVPATचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काही भागात VVPATचा वापर करण्यात आला होता.

गेल्या काही काळात सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे ईव्हीएम मशिन्सची विश्वासार्हता ढासळू लागली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता अधिक काटेकोर धोरणे अवलंबली असून त्यासाठी नवे तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे. त्यानुसारच आता देशभरात आगामी काळात VVPAT द्वारे मतदान होण्याची शक्यता आहे.