कांद्याचे भाव कमी असताना त्याची पेस्ट म्हणजे वाटलेला कांदा किंवा कांद्याची पूड करून अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाने साठवून ठेवावी आणि कांद्याचे भाव वाढतील किंवा पावसाळा असेल तेव्हा त्याचा वापर करावा, असा सल्ला अन्न प्रक्रिया मंत्री श्रीमती हरसिमरत सिंग बादल यांनी दिला आहे.कांद्याचे भाव वाढल्याने निर्यात भावात वाढ व दहा हजार टन कांदा आयात या प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लहान फूड पार्कमध्ये कांदा प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास एकरामागे १ कोटींचे अंशदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.श्रीमती बादल यांनी सांगितले की, कांद्याचे भाव नेहमी चक्राकार वाढत असतात व ते नेहमी पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे लोकांनी कांद्याच्या दरवाढीचा मार झेलण्यापूर्वीच कांद्यावर मोठय़ा प्रमाणात प्रक्रिया करून त्याचे वाटण किंवा पेस्ट तसेच पूड करून वापरावी, त्यात अन्न प्रक्रिया उद्योगांनी पुढाकार घ्यावा.कांद्याचे भाव वाढले असून ते ६० रुपयांच्या आसपास असले तरी व्यापारी ते ८० रुपये किलो दराने विकत आहेत.कांद्याचे भाव पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे भाव कमी असताना कांद्यावर प्रक्रिया करून तो साठवता येईल व कांद्याचे निर्जलीकरण करून त्याची भुकटी किंवा पेस्ट म्हणजे वाटण तयार करून ठेवता येईल. कांदा व इतर भाज्यांचे दर वाढतात तेव्हा अन्न प्रक्रिया उद्योगांनी असे टिकाऊ पदार्थ विकले तर त्याचा फायदाच होईल असे सांगून त्या म्हणाल्या की, सध्या आपण खराब होणाऱ्या कृषीमालापैकी केवळ दोन टक्के मालावर प्रक्रिया करतो त्यामुळे अन्न प्रक्रिया केली तर कोटय़वधी रुपयांची बचत होईल. अन्न प्रक्रिया मंत्रालय लहान फूड पार्क प्रकल्प तयार करीत आहे. या प्रकल्पांसाठी  ५० एकर जागा लागत नाही. सरकार अशा प्रक्रिया उद्योगांना एकरामागे १ कोटींचे अंशदान देणार आहे. लुधियाना येथील पोस्ट हार्वेस्ट इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने लोकांना कांद्याचे भाव वाढतात तेव्हा त्याची पूड किंवा कांद्याचे कोरडे काप वापरण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी व उद्योजकांना कांद्याचे वाळवण करून त्याचे फ्लेक्स किंवा भुकटी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यास ही संस्था तयार आहे.