गोळीबारापूर्वी निर्वाणीचा पर्याय म्हणूनच काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी  पेलेट गन्सचा वापर करावा, असे आदेश सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांशी झालेल्या व्यापक चर्चेनंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. गृह खात्याकडून आता काश्मीर खोऱ्यात तैनात असणाऱ्या सुरक्षा दलांसाठी स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर आखून देण्यात आली आहे. यामध्ये गोळीबारापूर्वीचा अंतिम पर्याय म्हणूनच पेलेट गन्स वापराव्यात, असे म्हटले आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना पावा शेल्स आणि प्लॅस्टिक बुलेटसचा सुरळीत पुरवठा करण्याचे आश्वासनही गृह खात्याने यावेळी दिले. जम्मू काश्मीरमध्ये ‘पेलेट गन्स’चा वापर टाळून रबरी गोळ्यांचा वापर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे काही दिवसांपूर्वीच महाधिवक्ता मुकल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत दगडफेकीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांना लाठीमार किंवा हवेत गोळीबार करावा लागतो. एवढं करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर सुरक्षा दलांकडून पेलेट गन्सचा वापर केला जातो. मात्र, यामुळे गंभीर दुखापत होण्याचे किंवा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये या गन्सचा वापर रोखण्यात यावा, अशी मागणी मानवी हक्क संघटनांनी उचलून धरली आहे.

 

नुकत्याच पार पडलेल्या श्रीनगरमधील पोटनिवडणुकांच्या काळात सैन्याच्या जवानाला स्थानिक तरूणांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी इंडो-तिबेटियन सीमा पोलीस आणि सीआरपीएफला अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.