शाकाहारी अन्न व मासे यांचा समावेश आहारात असेल तर मध्यम व गंभीर स्वरूपाचा करोना संसर्ग रोखला जातो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. सहा देशातील व्यक्तींनी त्यांच्या लक्षणांची जी माहिती दिली आहे त्यावरून हे निष्कर्ष  काढण्यात आले आहेत.

निरीक्षणात्मक पद्धतीची ही पाहणी असून त्यातून कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही. किंबहुना, आहार व कोविडची गंभीरता यांचा संबंध ठोसपणे दाखवण्यासाठी आणखी सखोल अभ्यासाची गरज आहे पण ढोबळ मानाने शाकाहार व मासे यांचा उपयोग होतो असे दिसून आले आहे. हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या ‘न्यूट्रिशन प्रिव्हेन्शन अँड हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाच्या आधारे असे सांगण्यात आले, की ७३ टक्के शाकाहारी व्यक्तींमध्ये करोना गंभीर पातळीवर जाण्याचे प्रमाण कमी दिसून आले, तर मासे सेवन करणाऱ्या ५९ टक्के लोकांमध्ये रोगांची गंभीरता कमी दिसून आली. अनेक अभ्यासांमध्ये आतापर्यंत करोनाची लक्षणे, गंभीरता व कालावधी यांचा संबंध जोडण्यात आला आहे. पण या संशोधनातील निष्कर्ष स्वीकारणे किंवा नाकारणे यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

‘जॉन हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या अमेरिकेतील संस्थेने म्हटले आहे, की त्यांनी फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ब्रिटन व अमेरिका या देशातील २८८४ डॉक्टर व परिचारिका यांचा अभ्यास केला असता त्यातही शाकाहाराचेच महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यात भाज्या, डाळी, शेंगदाणे व तत्सम पदार्थ, कमी प्रमाणात लाल मांस, कोंबडीचे मांस हाच आहार फायद्याचा दिसून आला आहे.