अमेरिकेतून मायदेशी परतलेल्या माजी वाणिज्यिक राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्या मुंबईतील आगमनासाठी वडील उत्तम खोब्रागडे यांनी राजकीय नेत्यांप्रमाणे शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. दिल्लीत बसून उत्तम खोब्रागडे मुंबई विमानतळावर देवयानीच्या स्वागतासाठी जास्तीत जास्त ‘कार्यकर्ते’ जमविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. देवयानी व उत्तम खोब्रागडे उद्या (मंगळवारी) दुपारी मुंबईला पतरणार आहेत.
दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनातून उत्तम खोब्रागडे यांनी महाराष्ट्रात देवयानीच्या स्वागताला ‘गर्दी’ होण्यासाठी दिवसभर आढावा घेतला. दूरध्वनीवरून ते आपल्या कार्यकर्त्यांना ‘पन्नासेक समर्थकांना घेऊन विमानतळावर या’, अशा सूचना देत होते. देवयानी अमेरिकेतून परतल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. अमेरिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे देवयानी प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबत त्यांच्या वडिलांनादेखील अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे माजी सनदी अधिकारी असलेल्या खोब्रागडे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यामुळे जागृत झाल्याचे बोलले जाते.  दिल्लीत मराठी पत्रकारांना जातीयवादी ठरवून मराठी बोलण्यास नकार दिल्याचे राजकीय दुष्परिणाम होण्याची भीती असल्यानेच खोब्रागडे यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी चालवली आहे. देवयानीच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शेकडो कार्यकर्ते आल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा खोब्रागडे यांना आहे.