उत्तर प्रदेशात प्रतिष्ठेच्या बनलेल्या राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशातून एकूण दहा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहेत. त्यातील आठ जागांवर भाजपाचा आणि एका जागेवर समाजवादी पार्टीचा विजय निश्चित होता. पण दहाव्या जागेसाठी खरी चुरस होती. भाजपाने ही जागा जिंकू नये यासाठी मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आले होते. पण भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बसपा उमेदवार बीआर आंबेडकरांचा पराभव केला.

अनिल अग्रवाल यांना पहिल्या पसंतीची १६ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्यांनी आंबेडकरांचा पराभव केला. बीआर आंबेडकरांना ३२ मते मिळाली. समाजवादी पार्टीकडून जया बच्चन ३८ मते मिळवून निवडून आल्या. भाजपाच्या अन्य आठ उमेदवारांना ३८ मते मिळाली. नुकत्याच झालेल्या फुलपूर आणि गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत अखिलेश-मायावती यांनी एकत्र येऊन भाजपाचा पराभव केला होता. राज्यभेतील या विजयाने भाजपाने पराभवाची सव्याज परतफेड केली अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान या निवडणुकीत दोन आमदारांची मते बाद ठरवण्यात आली. या आमदारांनी क्रॉस मतदान केले. आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने मतदान केल्याचे या आमदारांनी सांगितले. भाजपा आमदार नितीन अग्रवाल आणि बसप आमदार अनिल सिंह यांनी त्यांचे बॅलेट पेपर पोलिंग एजंटला दाखवले नाहीत. त्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्याची मागणी सपा आणि बसपाने केली होती.