गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न हत्याप्रकरणापाठोपाठ लखनौतही अशाच स्वरुपाची घटना घडली आहे. शाळा लवकर सुटावी यासाठी सातवीच्या विद्यार्थिनीने पहिलीतल्या मुलाला तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लखनौत राहणारा सात वर्षांचा हृतिक शर्मा हा त्रिवेणीनगर येथे ब्राईटलँड इंटर स्कूल या शाळेत पहिली इयत्तेत शिकतो. मंगळवारी शाळेतील सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. तुला शिक्षकांनी बोलावले आहे, असे सांगत त्या मुलीने ह्रतिकला शाळेतील स्वच्छता गृहात नेले. दरवाजा बंद करुन तिने ह्रतिकला बेदम मारहाण केली. यानंतर तीक्ष्ण हत्याराने ह्रतिकच्या पोटावर आणि छातीवर वार केले. रक्तबंबाळ ह्रतिकला बाथरुममध्येच कोंडून ती निघून गेली. घाबरलेला ह्रतिक मदतीसाठी ओरडत होता. त्याचा आवाज शाळेतील एका शिक्षिकेने ऐकला आणि ह्रतिकची सुटका झाली.

सुरुवातीला शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी ह्रतिकवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते तिथून ही माहिती प्रसारमाध्यमांना समजली आणि हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनीही तातडीने याची दखल घेत मुलाचा जबाब घेतला. तसेच शाळा प्रशासनाला नोटीसही बजावली. घटनेबाबत पोलिसांना माहिती का दिली नाही असा प्रश्न या नोटीशीत विचारण्यात आला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्या मुलीची ओळख पटवली. लवकरच तिला ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केले. गुरुवारी सकाळी शाळेबाहेर पालकांनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका रिना मानस यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करत असल्याचे माध्यमांना सांगितले.

‘बॉय कटवाली दिदी’ ने मारले

ह्रतिकने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सातवीत शिकणाऱ्या बॉय कट असलेल्या मुलीने त्याला मारहाण केली. ‘मला का मारतेस हे मी ताईला विचारलंही.यावर तिने शाळा लवकर सुटावी यासाठी मारत असल्याचे उत्तर मला दिले, असे ह्रतिकने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.