उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या काळात सुरु झालेल्या एन्काऊंटरचे सत्र आता सर्वसामान्यांच्या जिवावर बेतू लागले आहे. मथुरा येथे पोलीस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत आठ वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेला. घराबाहेर खेळत असताना गोळी लागून माधव भारद्वाज या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चकमकींवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मथुरातील मोहनबाग येथे चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील एक टोळी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांचे एक पथक मोहनपूरा परिसरात पोहोचले. काही वेळात दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु झाली. चकमकीदरम्यान यातील एक गोळी गावात घराजवळच खेळणाऱ्या आठ वर्षांच्या माधवला लागली. यात गंभीर जखमी झालेल्या माधवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरोडेखोरांच्या गोळीबारात माधवचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर ग्रामस्थही आक्रमक झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामस्थांनी तक्रार दिल्यास पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करुन चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

माधवचे आजोबा शिवशंकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. संध्याकाळी पोलीस गावात आले. त्यांनी दरोडेखोरांची माहिती विचारली. माहिती मिळताच पोलिसांनी संशयित दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला, यातच माझ्या नातवाचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी जखमी मुलाला ग्रामस्थांकडे सोपवले आणि ग्रामस्थांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले, असा दावाही केला जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेत आल्यापासून गुंड आणि सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या १० महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ९२१ चकमकी झाल्या असून यात जवळपास दोन हजारहून अधिक गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या चकमकीमध्ये किमान ३१ गुंडांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकींवरुन राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे.