मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांना शासकीय नोकरी देण्याचे आदेश आज शनिवार उत्तरप्रदेश सरकारने दिले असल्याची माहिती संबंधित शासकीय अधिकाऱयांनी दिली आहे.
“उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आधीच १५ सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांना शासकीय नोकरी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संबंधित मुझफ्फरनगर विभागात दंगलग्रस्तांना नोकरी देण्याचा फर्मान उत्तरप्रदेश सरकारमार्फत जारी करण्यात आला आहे. यात उमेदवाराची शैक्षणिक पातळी लक्षात घेऊन त्यांची योग्य त्या विभागात भरती करण्यात येणार आहे.” असे शासकीय अधिकाऱयांनी सांगितले आहे.
तसेच अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलीत एकूण ६३ जणांचा मृत्यू झाला होता व यातील पाच मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. क्वचितप्रसंगी दंगलग्रस्तांपैकी कोणी वयाच्या अठरा वर्षाखालील असल्यास, त्याची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरी देण्यात येईल असेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.