उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आखाड्यापासून दूर राहिलेल्या काँग्रेस उपाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील मतदारांना भावनिक ‘पत्र’ लिहिले आहे. इच्छा असूनही काही कारणांमुळे आपण उत्तर प्रदेश निवडणूक प्रचार करू शकलो नाही, असे सांगून त्यांनी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आखाड्यात समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. काँग्रेसकडून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचारात उतरले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात प्रियांका गांधीही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी निवडणूक प्रचारापासून दूरच राहिल्या आहेत. प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होता आले नसले तरी त्यांनी रायबरेली आणि राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी रायबरेली आणि अमेठीवासियांना काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन केले आहे. खूपच इच्छा असूनही काही कारणांमुळे मला प्रचारासाठी येणे जमत नाही. हे पत्र वैयक्तिक स्वरुपातील आहे, असे समजावे. तुम्हा लोकांचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. रायबरेली आणि अमेठी हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज मी जे आहे, त्याचे सर्व श्रेय तुम्हाला जाते. माझे आणि तुमचे जे काही नाते निर्माण झाले आहे, हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिदोरी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्राद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या केंद्रात असलेले सरकार तुम्हाला मुद्दामहून अनेक कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. आपल्याच लोकांना दुर्बल करणारे आणि लोकांच्या विरोधात काम करणारे सरकार तुम्ही कधी पाहिले आहे का, असा प्रश्न त्यांनी मतदारांना विचारला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मते देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केल्यास आपल्या मतदारसंघाचा वेगाने विकास करण्यासाठी मला ताकद मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची कमान आतापर्यंत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सांभाळली आहे. काँग्रेस उपाध्यक्षा सोनिया गांधी अद्याप प्रचारात उतरू शकल्या नाहीत. राज्यातील तीन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान २३ तारखेला होणार आहे. राज्यातील प्रमुख लढत काँग्रेस-समाजवादी पक्ष आघाडी, बसप आणि भाजपमध्ये आहे. या पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.