News Flash

गंगा स्वच्छ न झाल्यास मी प्राण देईन: उमा भारती

अखिलेश यादव सरकारवर तोफ

uma_bharti, bjp, UP election,
केंद्रीय मंत्री उमा भारती. (संग्रहित)

माझ्या कार्यकाळात गंगेची स्वच्छता न झाल्यास तर मी जीव देईन, असे केंद्रीय जलसंधारण आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांनी जाहीर केले आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. गोमती नदी प्रकल्पाच्या निर्मितीत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

याआधीच्या काँग्रेस सरकारच्या उदासीनतेमुळे गंगा अस्वच्छ राहिली. देश आणि जगभरातून गंगा स्वच्छतेसाठी पैसै घेऊन स्वतःची तिजोरी भरण्याचा प्रयत्न केल्यामुळे आतापर्यंत गंगा अस्वच्छ राहिली, असा आरोप उमा भारती यांनी केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार आल्यानंतर गंगेच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मोदी सरकारने ‘निर्मळ गंगा’साठी २० हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यात अनेक पातळ्यांवर अडचणी येत होत्या. त्यामुळे विलंब झाला, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील अखिलेश यादव सरकारने या योजनेसाठी बरेच दिवस ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

गंगेचे पाणी स्वच्छ करणे हेच माझ्या आयुष्याचे आता ध्येय बनले आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात गंगेची स्वच्छता झाली नाही तर, मी माझे प्राण देईन, असेही त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी अखिलेश सरकारवर कडक शब्दांत टीका केली. लखनऊमध्ये गोमती नदीवर अखिलेश सरकारने प्रकल्प उभारला आहे. मात्र, नदीची स्वच्छता करण्याचे काम सरकारने केलेच नाही. भूमाफिया आणि जमिनींवर कब्जा करण्यासाठीच अखिलेश यादव यांच्या सरकारने हा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कब्रस्तान’संबंधी केलेल्या वक्तव्याचेही समर्थन केले. अल्पसंख्याकांच्या विकासाची योजना तयार करताना बहुसंख्याकांचाही आम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचे वक्तव्य धर्माशी जोडले जात आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. आम्हाला सर्वांचा विकास करायचा आहे. सर्वांना केंद्रस्थानी ठेवून विकास साधायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 8:58 pm

Web Title: uttar pradesh assembly elections 2017 minister uma bharti slam akhilesh yadav government and congress
Next Stories
1 उत्तरप्रदेशला ‘कसाब’मुक्त करा; अमित शहा यांची विखारी टीका
2 Uttar Pradesh Assembly Elections 2017 : रायबरेली, अमेठीतील मतदारांना सोनियांचे भावनिक ‘पत्र’
3 ”अपमान’ झाला तर नवा पक्ष, ‘सन्मान’ मिळाल्यास समाजवादी पक्षातच’
Just Now!
X