लॉकडाउन सुरु असल्याने घराकडे निघालेल्या २४ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८० मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. या अपघातामध्ये १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र चहा पिण्याची तल्लफ झाल्याने या अपघातामधून अनेक मजुरांचा प्राण वाचल्याची माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीवरुन आलेला एक ट्रक ढाब्यावर उभा होता. या ट्रकमधील काही मजूर चहा पिण्यासाठी खाली उतरले होते तर काही मजूर ट्रकमध्येच बसले होते. हे सर्व मजूर उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागांमध्ये असणाऱ्या आपल्या मूळगावी परत निघाले होते. काही मजूर खाली उतरले असतानाच फरीदाबादहून आलेल्या ट्रकने ढाब्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या ट्रकमध्ये चून्याच्या गोणी आणि जवळजवळ ८० मजूर होते. ही धडक एवढी जोरदार होती ती धडक देणारा ट्रक जागेवर पलटला आणि त्याखाली काही मजूर चिरडले गेले. पलटी झालेल्या ट्रकमधून झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागांमधील मजूर आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. ट्रकचा अपघात झाला तेव्हा मजूर चुन्याच्या गोण्यांवर बसले होते. ट्रक पलटी झाल्याने अनेक मजूर या गोण्यांखाली दाबले गेले. त्यांना बाहेर काढेपर्यंत काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी दिली. हा सर्व अपघात चहा पिण्यासाठी ढाब्यावर गेलेल्या मजुरांच्या डोळ्यासमोर घडला. काही मजुरांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये चुन्याच्या गोणींच्या ढिगाऱ्या खालून काढलेल्या बँगांचा खच दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरैयामध्ये घडलेला अपघात हा दुर्देवी असल्याचे सांगत या अपघातामुळे दु:ख झाल्याचे म्हटलं आहे. “सरकारी यंत्रणा मदतकार्य करण्याचे काम करत असून या अपघातामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो,” असंही मोदींनी ट्विटरवरुन प्रितक्रिया देताना म्हटलं आहे.

“रात्री साडेतीनच्या सुमरास हा अपघात घडला. २३ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते-२० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकजण हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील रहिवाशी आहेत,” अशी माहिती औरैयाचे जिल्हाधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून जखमींना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेशही दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन अपघात नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश योगी यांनी दिले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी दिली आहे. तर काही अधिकाऱ्यांवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

औरैयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. १५ गंभीर जखमी रुग्णांना सैफिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर हे राजस्थानवरुन बिहार आणि झारखंडला जात होते.

मागील काही आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ८ मे रोजी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. मध्य प्रदेशमध्ये ९ मे रोजी झालेल्या अपघातामध्ये नरसिंगपूर जिल्ह्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला.