उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे अज्ञात व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आझमगडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. समाजकंटकांनी पुतळ्याचा हात तोडला होता. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार निदर्शनास आला.

पुतळ्याची विटंबना केल्याचे वृत्त समजताच बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी या घटनेचा निषेध करत तातडीने तिथे नवीन पुतळा लावावा, अशी मागणी केली. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली.