उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राक्षसाशी तुलना करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसंच हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्यांची सुरक्षा करत असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केला. “ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार आहेत. त्यांच्याकडे कोणतीही मूल्ये नाहीत,” असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्याकडून सुधारित नागरिकत्व कायद्याला होणाऱ्या विरोधाबद्दल विचारलं असता सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, “हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्यांना त्या सुरक्षा देत आहेत. अशा नेत्याला राक्षसच म्हणू शकतो”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “भाजपा देवतांचा पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष राक्षसी पक्ष आहेत”.

दहशतवाद्यांना सुरक्षा देणे म्हणजे राक्षसांचं संरक्षण करण्याचा प्रकार आहे असंही ते म्हणाले आहेत. राज्यात पोलीस आयुक्तालय यंत्रणेची अमलबाजवणी करण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “कोणतीही यंत्रणा तोपर्यंत बदल घडवू शकत नाही जोपर्यंत अधिकारी, कर्मचारी आणि लोकनेते समजाप्रती संवेदनशील असणार नाहीत”.