वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असलेले भाजपाचे खासदार भरत सिंह यांनी ख्रिश्चन मिशनरींमुळे देशातील एकता आणि अखंडतेला धोका असल्याचे सांगत काँग्रेस मिशनरींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला.

भरत सिंह म्हणाले की, ख्रिश्चन मिशनरी काँग्रेसचे नियंत्रण करतात. काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी हेही या मिशनरींच्या इशाऱ्यावर काम करतात. या मिशनरी देशाच्या अखंडतेसाठी धोकादायक आहेत. ईशान्येमधील राज्यांमध्ये मिशनरींनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले आहे. त्यामुळे देश कमकुवत झाला आहे. मिशनरींच्या षडयंत्रामुळे देशाला धोका असल्याचेही ते म्हणाले.

न्या. लोयांच्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. अमित शाह यांना फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसचा लोया यांच्या प्रकरणानंतर भंडाफोड झाला असल्याचे ते म्हणाले.

भरत सिंह यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेमागे ख्रिश्चन मिशनरींचा हात असल्याचे म्हटले होते. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ख्रिश्चन मिशनरींवर आरोप केले होते. विदेशी ख्रिश्चन मिशनरी हिंदू समाजात फूट पाडत आहेत. आंबेडकर यांचा पुतळा तोडण्यामागे ख्रिश्चन मिशनरींचा हात आहे. परंतु, त्यांचा हा डाव भाजपा सरकार यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.