बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी बुधवारी आणखी एका माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी केली. इंद्रजित सरोज यांना बसपमधून नारळ देण्यात आला असून या कारवाईनंतर सरोज यांनी मायावतींवर गंभीर आरोप केले आहेत. मायावतींनी १५ लाख रुपयांची मागणी केली होती, त्यांना पैसे घेण्याचा आजार आहे अशी टीका सरोज यांनी केली.

बसपच्या प्रमुख मायावती यांनी बुधवारी नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्यानंतर माजी मंत्री इंद्रजित सरोज यांची पक्षातून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर सरोज यांनी मायावतींवर तिखट शब्दात टीका केली. ‘मायावती पैशांची देवी आहे, त्यांना पैसे घेण्याचा आजार असून त्यांनी यासाठी चांगल्या डॉक्टरकडून उपचार घ्यायला पाहिजे’ असा टोला सरोज यांनी लगावला. उपचार घेतल्यास पैसे घेण्याची सवय जाईल असे त्यांनी म्हटले आहे. बसपचा पाय दिवसेगणिक खोलात जात असल्याचे सांगत त्यांनी मायावतींवर निशाणा साधला.

गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत नेमके काय झाले याचाही सरोज यांनी खुलासा केला. मध्य प्रदेश, राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीतील बसप उमेदवारांसाठी उत्तर प्रदेशातून पैसे पाठवण्याचा निर्णय मायावतींनी घेतला होता. यासाठी माजी आमदारांनी ९ लाख रुपये, जिल्हा अध्यक्षांनी १५ लाख रुपये आणि मंडळ अध्यक्षांनी २२ लाख रुपये द्यावे असा फतवा मायावतींनी काढल्याचा दावा सरोज यांनी केला. मात्र आमची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही, त्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही असे मी बैठकीत सांगितल्याचे सरोज यांचे म्हणणे आहे. यामुळेच मायावतींनी माझ्यावर कारवाई केली असा आरोप त्यांनी केला.

सरोज हे मायावतींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. सरोज हे चार वेळा मंझनपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेत त्यांचा पराभव झाला. स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्यानंतर बसपतून हकालपट्टी झालेले सरोज हे तिसरे नेते आहे. सरोज हे बसपचा दलित चेहरा होते. जाटव वगळता उर्वरित दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मायावतींच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीदेखील होते.