जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वसामान्य माणसापासून ते व्हीआयपी व्यक्ती देखील करोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यांचे संपूर्ण नाव कमल राणी वरूण असं आहे.

कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. शिवाय, या अगोदर त्या खासदारही  होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१७ मध्ये भाजपाने त्यांना कानपूरमधील घाटमापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेवरून विजयी झालेल्या त्या भाजपाच्या पहिल्या उमेदवार होत्या. पक्षातील त्यांचे योगदान पाहून भाजपाकडून त्यांना २०१९ मध्ये कॅबिनेट मंत्री बनवले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमल वरूण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मी कमल वरूण यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते व एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या लोकप्रिय नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कॅबिनेटचा भाग असताना त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम केले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्येने आता १७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले व ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहचली आहे.

देशातील १७ लाख ५० हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ११ लाख ४५ हजार ६३० जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.