उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पूर्वी गुंड-माफियांच्या हाती सत्तेची सूत्रे होती, पण आता ही स्थिती पालटली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटकांना गजाआड पाठविले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदित्यनाथ सरकारच्या कामाची प्रशंसा केली.

याआधी गरिबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे आणले जात असत, पण आता असे कोणतेही अडथळे नसून योजनांचे लाभ गरजूंना मिळत आहेत, असेही मोदी म्हणाले.

येथील राजा महेंद्रप्रताप सिंह राज्य विद्यापीठाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ राजा महेंद्रप्रताप सिंह यांच्या स्मृत्यर्थ हे विद्यापीठ राज्य सरकारतर्फे स्थापन केले जात आहे. अलिगडच्या कोल तालुक्यात लोढा आणि मुसेपूस करीम जारौली गावाच्या हद्दीत ९२ एकर क्षेत्रावर हे विद्यापीठ उभे राहत आहे.

मोदी यांनी उत्तर प्रदेश संरक्षण उद्योग कॉरिडोरच्या अलिगड विभागीय प्रदर्शनालाही भेट दिली. याआधी भारतात संरक्षण सामग्रीची आयात केली जात होती, पण आता देश संरक्षण साहित्याचा अग्रगण्य निर्यातदार बनला आहे, असे त्यांनी सांगितले.

जाट समाजातील राजा महेंद्रप्रताप सिंह यांच्या नावाने विद्यापीठ उभारून भाजप सरकार जाट समाजातील नाराज घटकांना आपल्याकडे वळवित असल्याचे मानले जात आहे. शेतकरी आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या जाट मतदारांत भाजपविरोधी भावना दिसून येते.