सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी ११ रूपये आणि एक विट देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. झारखंडमधील निवडणुकीच्या रॅलीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना हे आवाहन केलं आहे.

योगी आदित्यनाथ हे भाजपा उमेदवार नागेंद्र महतो यांच्या सभेसाठी उपस्थित होते. “५०० वर्षांपासून सुरू असेलेला वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुटला. काँग्रेस, आरजेडी, सीपीआय-एमएल आणि काही अन्य पक्षांना या वाद मिटू नये असं वाटत होतं,” असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. “लवकरच अयोध्येत एक भव्य राम मंदिर उभं राहणार आहे. झारखंडवासीयांनी यासाठी आपल्याकडून ११ रूपये आणि एक विट द्यावी,” असं आवाहन मी करत आहे, असंही ते म्हणाले.

“मी उत्तर प्रदेशमधून आलो आहे. जी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटलं जायचं. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील करत आहेत,” असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे शेजारी देशातील हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध आणि पारशी धर्मियांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याविरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. काँग्रेस ही पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोपही आदित्यनाथ यांनी यावेळी केला