आज प्रभू रामाचं नाव घेणारे तीच लोक आहेत ज्यांनी अयोध्येतील या जागेवरुन रामलल्लाची मूर्ती हटवली आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केलं. योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी भूमिपूजनासाठी जाहीर पाठिंबा देत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, “आज काही लोक जे प्रभू रामाचं नाव घेत आहेत तेच लोक रामलल्लाची मूर्ती हटवण्यासाठी जबाबदार होते. त्यांना मूळ जागेवरुन २०० मीटर अंतरावर मंदिर उभारायचं होतं”.

आणखी वाचा- पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार – नरेंद्र मोदी

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी १७५ जणांना निंमंत्रित कऱण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठी हजर होते. विरोधी पक्षातील नेत्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित का करण्यात आलं नाही असं विचारलं असताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, “आम्हाला प्रत्येकाला निमंत्रण देण्याची इच्छा होती. पण करोनामुळे फक्त २०० जणांनाच निमंत्रित करु शकत होतो. अनेक भाजपा नेतेही कार्यक्रमात सहभागी नव्हते. आमचे राष्ट्रीय अध्यक्षही हजर नव्हते”.

“प्रभू राम सगळ्यांसाठी आहेत. प्रभू रामाच्या नावाचा वापर करुन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होता कामा नये. आम्ही प्रभू रामाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. “आज प्रभू रामाचं नाव घेणाऱ्यांनी १९४९, १९८४ आणि पुढील वर्षांमध्ये आपला काय दृष्टीकोन होता याचा विचार करावा. याआधी ते वेगळी भाषा बोलत होते आणि आता वेगळी भाषा बोलत आहेत,” अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्विट; म्हणाले…

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला धार्मिक रंग दिला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “जे प्रभू रामाकडे इतक्या छोट्या बुद्धीमत्तेने पाहत आहेत ते लोक फक्त निवडणुकीवेळी हिंदू मतांसाठी मंदिरात जात असतात”.