उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ऊसाऐवजी इतर पिके घेण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी इतर पीकं घ्यावीत. दिल्लीची बाजारपेठ जवळच आहे. साखर खाल्ल्याने लोकांना मधुमेह होतो. त्यामुळे ऊसाऐवजी इतर पीकं घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी ऑक्टोबरपर्यंत देण्याची सूचनाही त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बागपत येथे विविध रस्ते योजनांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. गरीब तसेच शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे प्राधान्य आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत रक्कम दिली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रस, सपा आणि बसपाने जातीच्या आधारावर समाज विभागला आहे. आम्ही सर्वांना आपले सण साजरा करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यावेळी कावड यात्राही व्यवस्थित पार पडली.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका पाहता भाजपा शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी त्यांना अडचणीची ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे १०००० कोटी रूपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी भाजपावर नाराज असल्याचे सांगण्यात येते. याचाच फटका मागील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला बसला. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा प्रामुख्याने उठवला होता.