उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सरकारी अधिकाऱ्यांची झोप उडवणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक जोर का झटका दिला आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या लखनऊतील सहा ‘मेडिकल व्हेंटिलेटर’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राज्यातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचली पाहिजे, असे सांगितले. तर वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टरांनाही यावेळी त्यांनी इशारा दिला. रुग्णांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले.

आगामी काळात सुमारे ५ लाख डॉक्टरांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षांत उत्तर प्रदेशात २५ वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यात ‘एम्स’सारख्या सहा संस्थाही स्थापन करण्यात येणार आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. सरकारी डॉक्टरांनी खासगी रुग्णालयांमध्ये कामे करू नयेत. तसेच वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली रुग्णांची होणारी लूट अजिबात खपवून घेणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी डॉक्टरांना दिला. मोठ्या विश्वासाने गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयांमध्ये येतात. मात्र, रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटर बंद पडलेले असतात. डॉक्टर बऱ्याचदा केवळ रिपोर्ट पाहून त्यांना औषधे लिहून देतात आणि घरी पाठवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती कमी करण्याची गरज आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय तंत्रज्ञान सुविधा आणखी चांगली करण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. मागील सरकारच्या काळात चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना सैफई आणि कन्नोजमध्ये पाठवले जात होते. डॉक्टरांनी टोळीसारखे काम करू नये. त्यांनी प्रयत्न केल्यास या परिस्थितीत बदल नक्कीच होईल. रुग्णांबद्दल संवेदनशील होणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी डॉक्टरांना केले आहे.