उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये सख्या दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना ताजीच आहे.  आचा उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगरमध्ये एक आणि कुर्थलमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे.
मुझ्झफरनगरमधील दुल्हेरा गावातील एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहापूर या खेड्यातून दुल्हेरा या तिच्या गावाकडे जात असताना पाच अज्ञातांनी तिच्यावर बलात्कार केला. पाच अज्ञांतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या घटनेमध्ये कुर्थल येथे शेतामध्ये काम करत असलेल्या वडिलांसाठी जेवण घेऊन जात असलेली १५ वर्षीय युवती गेल्या तीन दिवसांपासून गायब होती. तिचा मृत देह शेतातील एका विहिरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. तिच्यावर देखील सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.