आठ पोलिसांना ठार करणारा गुंड विकास दुबे शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यातून पळताना चकमकीत ठार झाला. परंतु या कथित पोलीस चकमकीबद्दल संशय निर्माण करणारे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी विकास दुबेला गुरुवारी उजैन येथील एका मंदिरात अटक केली. त्याला गुरुवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीस त्याला कानपुरला नेत होते. परंतु पोलिसांच्या ताफ्यातील एक मोटार शुक्रवारी सकाळी कानपूरनजीक पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर उलटली. नेमक्या या मोटारीत दुबे होता. अपघातात जखमी झालेल्या एका पोलिसाकडील पिस्तूल त्याने हिसकावले आणि गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दुबे ठार झाला, असा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा आहे. या अपघातात आणि गोळीबारात विशेष कृती दलातील दोघा जवानांसह सहा पोलीस जखमी झाल्याची माहितीही एका अधिकाऱ्याने दिली.

‘‘मोटार उलटल्यानंतर जखमी झालेल्या पोलिसाचे पिस्तूल हिसकावून दुबे पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला शरण येण्यास सांगितले. परंतु त्याने ‘ठार मारण्याच्या उद्देशाने’ गोळीबार केला असता पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला’’, असे कानपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले.

कानपूर जिल्ह्य़ातील बिकरू खेडय़ात २ जुलैच्या मध्यरात्री दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. या हल्ल्यात आठ पोलीस ठार झाले. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याची खबर देणाऱ्यास इनामही जाहीर करण्यात आले होते. मध्य प्रदेश पोलिसांनी दुबेला गुरुवारी सकाळी उज्जनमधील महाकाल मंदिराबाहेर अटक केली होती. सायंकाळी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

दरम्यान, या कथित चकमकीबाबत विरोधी राजकीय पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांच्या ताफ्यामागोमाग जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या वाहनांना चकमकीआधी काही वेळ मागेच रोखण्यात आल्याचा आणि पोलिसांचा ताफा उज्जनहून निघाला, त्या वेळी दुबे दुसऱ्या मोटारीत बसल्याचे काही चित्रफितींमध्ये दिसत असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी, मोटारींची अदलाबदल झाली नसल्याचे आणि प्रसार माध्यमांना तपासणीसाठी थांबवले असावे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

दुबेला मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या छातीत तीन आणि हातात एक अशा चार गोळ्या लागल्या होत्या. डॉक्टरांचा एक चमू दुबेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणार आहे. त्याची करोना चाचणी नकारात्मक आली आहे, अशी माहिती गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी या चकमकीचा, तसेच गेल्या आठवडय़ात आठ पोलीस ठार झालेल्या चकमकीचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी केली आहे. ‘आता गुन्हेगार ठार झाला आहे, मात्र त्याला ‘संरक्षण’ देणाऱ्यांचे काय’, असा प्रश्न काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. विकास दुबे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

या प्रकरणात कुठलीही मोटार उलटलेली नाही; वस्तुस्थिती उघड होऊ नये म्हणून ही चकमक घडवण्यात आली आहे. या चकमकीने आदित्यनाथ सरकारला वाचवले आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.

चकमकीबाबत इशारा

विकास दुबेला ठार मारण्याची शंका व्यक्त करणारी याचिका एका वकिलाने कथित चकमकीच्या काही तास आधी सर्वोच्च न्यायालयात केली होती. दुबेचे संरक्षण करण्याचे आणि तो पोलिसांकडून मारला जाणार नाही याची हमी देण्याबाबतचे निर्देश उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांना द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड्. घन:श्याम दुबे यांनी याचिकेत केली होती. उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (नागरी संरक्षण) अमिताभ तिवारी यांनीही दुबेच्या जिवाला धोका होऊ शकतो, अशी शक्यता कथित चकमकीच्या एक दिवस आधी व्यक्त केली होती. ‘विकास दुबे शरण आला आहे. तो उद्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ठार होऊ शकतो. तसे घडले तर विकास दुबे प्रकरणाचा अंत होईल’, असे ट्वीट त्यांनी हिंदीत केले होते.

आक्षेप आणि आरोप

* पोलिसांनी दुबेला उज्जनच्या महाकाल मंदिराजवळ अटक केली त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही?

* उलटलेल्या मोटारीतून सुटका करून घेण्यासाठी कुणी पोलिसाचे शस्त्र हिसकावू शकतो, हे संशयास्पद.

* दुबे याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप होता; या आरोपाचे पुढे काय होणार?

* पोलिसांच्या ताफ्यामागोमाग जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या वाहनांना चकमकीआधी मागेच रोखण्यात आल्याचा आरोप.

* पोलिसांचा ताफा उज्जनहून निघाला, त्या वेळी दुबे दुसऱ्या मोटारीत बसल्याचे काही चित्रफितींमध्ये दिसते.

अंत्यसंस्कारही उरकले

गुंड विकास दुबे पोलीस चकमकीबद्दल अनेक आक्षेप, आरोप असताना आणि विरोधी पक्षांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली असताना शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.