कर्ज फेडावं लागू नये म्हणून उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये एका पित्याने स्वत:च्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. मुलाचे अपहरण झाल्याने ग्रामस्थ पैसे परत करण्याचा तगादा लावणार नाही, असे त्या पित्याला वाटत होते. मात्र, मुलाच्या अपहरणाची तक्रार केल्याने त्याचे हे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली.

अलीगढमधील ताहरपूर या गावात राहणाऱ्या दानवीर शर्माचा सहा वर्षांचा मुलगा अनुज याचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. बुधवारी सकाळी अनुज खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्याच्या आईने ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला. दुपारच्या सुमारास दानवीरला खंडणीचा फोन आला. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून त्याच्या सुटकेसाठी १५ लाख रुपये द्यावे’, अशी मागणी खंडणीखोरांनी केली. शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले.

पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र, मुलाच्या अपहरणाची तक्रार करतानाही दानवीर शांत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर आला. खंडणीचा फोन ज्या नंबरवरुन आला, त्याचा देखील पोलिसांनी शोध सुरु केला. शेवटी पोलिसांनी दानवीरची कसून चौकशी केली असता त्याने पत्नी आणि दोन नातेवाईकांच्या मदतीने मुलाच्या अपहरणाचा कट रचल्याची कबुली दिली. डोक्यावर १२ लाखांचे कर्ज होते. पैसे परत करण्यासाठी गावातील मंडळी मागे लागली होती. त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी हा कट रचल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दानवीर, त्याची पत्नी आणि दोन नातेवाईकांविरोधात अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दानवीरच्या दोन नातेवाईकांना देखील अटक केली आहे. त्या दोघांनी मुलाचे अपहरण करुन दानवीरला खंडणीसाठी फोन केला होता.