उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार करणं एका पित्याच्या जीवावर बेतलंय. मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून पित्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हाथरस जिल्ह्यातील सासनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नौजरपूर गावात सोमवारी ही घटना घडली. पिता अमरीश यांनी आपल्या मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. या रागातून सोमवारी संध्याकाळी उशीरा अमरीश यांच्या शेतात जाऊन त्यांची हत्या करण्यात आली. आज तकच्या वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी अमरीश यांच्या शेतात बटाटे काढण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी चार जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अमरीश यांना तात्काळ रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

शेतात फायरिंग झाल्यामुळे शेतातील इतर मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. नंतर, अमरीश यांची मुलगी जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा पित्याचा मृत्यू झालाचं पाहून तिला धक्काच बसला. पोलिसांसमोर तिने आपल्या पित्यासाठी न्यायाची मागणी करत टाहो फोडला. यावेळी तिने, ‘माझ्यासोबत काही गुंडांनी छेडछाड केली होती. त्याची तक्रार वडिलांनी पोलिसांत केली होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी मिळून पित्याची हत्या केल्याचा तिने आरोप केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कुटुंबाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत., अशी माहिती डीएसपी रुची गुप्ता यांनी दिली.