लखनऊ : कुख्यात गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची केलेली हत्या आणि दुबे याची पोलिसांशी झालेली चकमक या घटनांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने रविवारी एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शशिकांत अग्रवाल यांची वरील घटनांच्या चौकशीसाठी नियुक्ती केली असून त्यांना आपला अहवाल दोन महिन्यांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. या कालावधीत सरकारच्या आदेशानुसार बदल करता येणार असून आयोगाचे कामकाज कानपूर येथून चालणार आहे.

दरम्यान, दुबे याचे पोलिसांशी आणि विविध विभागांमधील कर्मचारी यांच्याशी असलेल्या संबंधांचीही चौकशी एकसदस्यीय आयोग करणार आहे, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यासाठी आयोग काही उपायही सुचविणार आहे.

विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी २ आणि ३ जुलैच्या मध्यरात्री केलेली आठ पोलिसांची हत्या आणि १० जुलै रोजी विकास दुबे चकमकीत मारला जाणे या घटना सार्वजनिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे या प्रकरणांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे. आयोग २-३ जुलै ते १० जुलै या कालावधीत झालेल्या सर्व चकमकींची चौकशी करणार आहे.