ज्युनिअर नेमबाजी विश्वचषकासाठी निवड होऊनही आर्थिक अडचणीमुळे दौरा रद्द करणाऱ्या मुलीसाठी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे सरसावले आहेत. उत्तर प्रदेशच्या मिरत जिल्ह्यातील प्रिया सिंह या खेळाडूची जून महिन्यात जर्मनी येथे होणाऱ्या ज्यूनिअर नेमबाजी विश्वचषकासाठी निवड झाली होती. आर्थिक परिस्थीतीमुळे अडचणीत सापडलेल्या प्रियाला योगी आदित्यनाथ यांनी सरकारकडून ४.५ लाखांची मदत केली आहे. प्रिया ५० मी. रायफल प्रोन प्रकारात नेमबाजी करते.

प्रियाचे वडील ब्रिजपाल सिंह हे मोल-मजुरी करुन महिन्याकाठी दहा हजार रुपये कमावतात. मोठी नेमबाज बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या आपल्या मुलीसाठी रायफल खरेदी करण्याचे पैसेही ब्रिजपाल यांच्यापाशी नव्हते. त्यामुळे प्रियाची विश्वचषकाची संधी हुकू नये याकरता ब्रिजपाल सिंह यांनी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. ब्रिजपाल यांच्या मागणी मान्य करत योगी आदित्यनाथ यांनीही मिरत जिल्हाधीकाऱ्यांना प्रियाला सरकारी निधीतून साडेचार लाख रुपये आणि येण्या-जाण्याच्या खर्चाची तजवीज करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश राज्याच्या क्रीडा धोरणानुसार कोणत्याही स्पर्धेत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना सरकारी मदतीचा फायदा मिळतो. मात्र प्रिया अंतिम फेरीत ६ जणींमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. मात्र तिच्यामधली गुणवत्ता पाहता योगी आदित्यनाथ यांनी प्रियाला सरकारी मदत करण्याचं ठरवलं आहे. सरकारी मदत मिळण्याची घोषणा झाल्यानंतर, राष्ट्रीय रायफल संघटनेने प्रियाला लवकरात लवकर रायफलचा परवाना मिळवून देण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे विश्वचषकात प्रिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असेल.