भाजपाचे उत्तर प्रदेशमधील खासदार हरी नारायण राजभर यांनी अयोध्येत प्रभू रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्यावे, अशी मागणी करणारे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू राम एका तंबूत राहत असल्याने त्यांना या योजनेअंतर्गत घर देण्याची मागणी राजभर यांनी केली आहे.

घोसी येथील भाजपाचे खासदार राजभर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रक पाठवले आहे. या पत्रात राजभर यांनी अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू रामासाठी घर बांधून देण्याची मागणी केली आहे. १९९२ पासून प्रभू राम हे रामलल्ला येथील तंबूत राहत आहेत. थंडी, उन्हाळा आणि पाऊस अशा कठीण परिस्थितीत ते राहत असून त्यांच्या डोक्यावर हक्काचे छत्र हवे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. बेघर लोकांना हक्काचे घर देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून जिल्हा प्रशासनाने प्रभू रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार राजभर यांनी यापूर्वीही राम मंदिरासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मंगळवारी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत राजभर यांनी राम मंदिरासाठी सरकार कायदा आणणार का?, असा सवाल सरकारला विचारला होता. ‘मी बैठकीत राम मंदिराचा मुद्दा मांडला, राम मंदिर कधी बांधणार, यासाठी कायदा कधी आणणार, असा प्रश्न मी विचारला. राम मंदिर हा सर्वांसाठी श्रद्धेचा विषय आहे, असे त्यांनी बैठकीनंतर सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिराचे काम सुरु करण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राम मंदिरावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.