उत्तर प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सूर्यकुमार शुक्ला सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शूक्ला हे 31 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून निवृत्तीनंतर तुमच्यासाठी प्रचार करायचा आहे, सरकारमधल्या रिकाम्या असलेल्या आयोगांमध्ये मला सेवा बजावण्याची संधी द्यावी, कुठलंतरी अध्यक्षपद द्यावं अशी मागणी केली आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची सार्वजनिकपणे शपथ घेतल्यामुळे शूक्ला यापूर्वी चर्चेत आले होते.

23 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश गृहविभागाचे डीजी सूर्यकुमार शुक्ला यांनी योगी आदित्यनाथांना हे पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून सूर्यकुमार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमधल्या रिकाम्या असलेल्या आयोगांमध्ये मला सेवा बजावण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

तुमच्या सरकारमधील अनेक पदे अद्याप रिकामी आहेत. त्यातील कोणत्याही पदावर माझी नियुक्ती केल्यास मी तुम्हाला सहकार्य करेन. सूर्यकुमार यांनी उपाध्यक्ष योजना आयोग, अध्यक्ष खादी ग्रामोद्योग बोर्ड, अध्यक्ष राज्य समाज कल्याण बोर्ड आणि अध्यक्ष यूपी प्रदूषण नियंत्रण बोर्डांमधल्या कोणत्याही एका विभागात नियुक्ती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सेवेमध्ये असताना अशाप्रकारचं पत्र लिहिणं योग्य वाटतं का असा प्रश्न शूक्ला यांना पत्रकारांनी विचारला असता यामध्ये काहीही चुकीचं असल्याचं मला वाटत नाही असं ते म्हणाले. निवृत्तीला अवघे काही दिवसच उरले आहेत, जर कोणी व्यक्ती निवृत्तीनंतर राजकिय किंवा सामाजिक कार्य करु इच्छित असेल तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही असं शूक्ला म्हणाले.