गावात लव्ह जिहादची अफवा पसरल्यानंतर पोलीस विवाह रोखण्यासाठी पोहोचले. पण चौकशी केल्यानंतर मुलगी आणि मुलगा एकाच धर्माचे आहेत तसेच ते अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील खुशीनगरमध्ये ही घटना घडली. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या मार्गाने होणारे विवाह रोखण्यासाठी अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी गुरमिया गावातून कोणीतरी स्थानिक पोलिसांना कळवलं की, गावात गुपचूप विवाह होणार आहे. मुस्लिम मुलगा हिंदू मुलीबरोबर विवाह करणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सर्कल अधिकारी पियुष कांत राय आपल्या टीमसह विवाहस्थळी पोहोचले. तिथे मौलवी आणि ते जोडपं होतं. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मुलगा आणि मुलगी अल्पवयीन नसून मुस्लिम धर्मीय असल्याचं चौकशीतून स्पष्ट झालं असं खुशीनगरचे एसपी विनोद कुमार सिंह यांनी सांगितले.

मुलगी १३ दिवसांपूर्वी आझमगडहून पळून आली होती. व्हिडीओ कॉल दरम्यान कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली असे खुशीनगरच्या एसपींनी सांगितले. हे जोडपे पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटले होते. तिथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर फोनवर त्यांनी बोलणे सुरु केले व नंतर लग्नाचा निर्णय घेतला. मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. पण नंतर त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यात आली.