सापाने माणसाला दंश केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पण उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अजब घटना घडली आहे. एक तरुण बदला घेण्यासाठी चक्क सापाला चावला. मात्र, यानंतर तो भोवळ पडला आणि हा सर्व प्रकार समोर आला.

हरदोईत राहणाऱ्या सोनेलाल याला अमलीपदार्थाचे व्यसन असल्याचे समजते. सोनेलाल दोन दिवसांपूर्वी भोवळ येऊन पडल्याचे स्थानिकांना दिसले. त्यांनी सोनेलालला सरकारी रुग्णालयात भरती केले. सोनेलालला सापाने दंश केल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. त्यांच्या शरीरावर सर्पदंशाची खुण नव्हती. मात्र, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचाराला सुरुवात केली.

सोनेलाल शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्याकडे नेमके काय झाले याबाबत विचारणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. सोनेलाल गुरांना चरायला घेऊन गेला होता. याच दरम्यान त्याला पायाजवळ साप दिसला. सापाने दंश केल्याचे त्याला वाटले. याचा बदला घेण्यासाठी त्याने सापाचा चावा घेतला. त्याने सापाचा डोक्याकडील भागाचा लचकाच तोडला. सापामधील विष काही प्रमाणात शरीरात गेल्याने तो चक्कर येऊन पडल्याचे समोर आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

सोनेलालची बातमी वाराच्या वेगाने पसरत गेली आणि रुग्णालयात त्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. ‘मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. एखादा माणूस सापाला कसं काय चावू शकतो’, असे एका ग्रामस्थाने माध्यमांशी बोलताना सांगितले. रुग्णालयातील मानसोपचार विभागातील डॉ. एस. सी. तिवारी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ‘ही नॉर्मल प्रतिक्रिया नव्हती. तो खूपच रागीट असू शकतो. त्यामुळे एखादा व्यक्ती असे कृत्य करु शकते, असे त्यांनी सांगितले.