काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला माहिती नसल्यास अनेकजण इंटरनेटची मदत घेतात. पण, उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांना इंटरनेटवरील माहितीचा आधार घेणं जरा महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री बरेच चर्चेत आले आहेत. कारण या मंत्रीमहोयांनी जवळपास सात महिने आधीच गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपा प्रवक्ते आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह, वैद्यकिय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन आणि कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांचा समावेश आहे. हिंदू दिनदर्शिेकेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूरब म्हणजेच गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २३ नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. पण, ट्विट करण्यापूर्वी ही बाब लक्षात न आल्यामुळे त्यांच्यावर सर्वांसमोरच तोंडघशी पडण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं. ही बाब लक्षात आल्यानंतर मंत्रीमहोदयांनी त्या आशयाचे ट्विच डिलीटही केले. सिद्धार्थ नाथ सिंह यांनी या चुकीचं गांभीर्य लक्षात घेत सर्वांचीच माफी मागितली. माफी मागताना केलेल्या ट्विटच्यामाध्यमातून त्यांनी या सर्व गोंधळाचं खापर विकीपीडियाच्या माथ्यावर फोडलं. ज्यामध्ये त्यांनी यासंबंधीचा एक स्क्रिनशॉटही जोडला.

‘गुरुनानक जयंतीच्या त्या ट्विटसाठी आम्ही तुम्हा सर्वांचीच माफी मागतो. हा सर्व गोंधळ विकीपिडियामुळे झाला’, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. कारण अनेकांनीच मंत्रीमहोदयांची खिल्ली उडवण्यास आणि उपरोधिक ट्विट करण्यास सुरुवात केली होती. विकीपिडीया ऐवजी देशाकडे लक्ष द्या, निदान कार्तिक पौर्णिमा तरी लक्षात ठेवा या आशयाचे ट्विट करत अनेकांनीच त्यांची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांचा हा गोंधळ सोशल मीडियावर चर्चेसाठी नवा विषय ठरला हे खरं.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती