उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन आता दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. फटाक्यांमुळे प्रदुषण होत असल्याच्या मुद्द्यावरुन साक्षी महाराज यांनी ज्या वर्षी बकऱ्यांशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल त्याच वर्षी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी केली जाईल. जर देशामध्ये बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली तर दिवाळीमध्येही फटाके फोडले जाणार नाही असं साक्षी महाराज म्हणाले आहेत.

साक्षी महाराज यांना करोनाचा संसर्ग झाला असून तो होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सध्या फेसबुकवर फटाक्यांमुळे दिवाळीच्या काळात होणाऱ्या प्रदुषाणासंदर्भात सुरु असणाऱ्या चर्चा आणि फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यावरुनच साक्षी महाराज यांनी टोला लगावला आहे. त्यांनी बकरी ईद आणि दिवाळीची तुलना करताना, “ज्या दिवशी बकरीशिवाय बकरी ईद साजरी होईल त्या दिवशीच फटाक्यांशिवाय दिवाळी सुद्धा साजरी केली जाईल. प्रदुषणाच्या नावाखाली फटाक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका,” असं म्हटलं आहे.

साक्षी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी कायमच चर्चेत असतात. त्यांनी फेसबुकवर केलेली ही फटाक्यांच्या बंदीविरोधातील पोस्ट सध्या व्हायरल झाली असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. साक्षी महाराज यांना बंगरमऊ विधानसभा पोटनिवडणुकीनंतर अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करुन घेतली असता ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर त्यांनी ट्विटवरुनच यासंदर्भात माहिती देत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्यावी असं आवाहन केलं होतं.