एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार ‘स्वच्छ भारत’सारखी देशाची प्रतिमा बदलायला लावणारी योजना राबवत असताना दुसरीकडे सरकारी अधिकारीच सार्वजनिक ठिकाणी घाण करीत असल्याचे एक उदाहरण पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ओ. बी. श्रीवास्तव तेथील त्रिवेणी संगमामध्ये लघुशंका करताना व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत.
अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदीवरील त्रिवेणी संगमामध्ये लघुशंका केल्याचे चित्रीत झाल्यामुळे श्रीवास्तव यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होते आहे. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने ‘नमामी गंगा’ उपक्रम सुरू केला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण याच ठिकाणी सरकारी अधिकारी लघुशंका करीत असल्याचे उघड झाल्यानंतर रोष व्यक्त करण्यात येतो आहे.